संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहाही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची रितसर सुनावणी सुरू होणार आहे. दोन्ही बाजूने होणारे युक्तिवाद आणि पुरावे पाहून कोर्ट त्यावर फैसला सुनावणार आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 14 जुलै रोजी 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.यामध्ये राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुलं, एक मुलगी आणि इतर सहा जणांचा समावेश होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर 58 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झाले होते. आता सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी विवाह झाला होता. दोघांचाही प्रेम विवाह होता. शशांक याने वैष्णवीच्या घरच्यांकडून लग्नात गाडी घेतली होती. एवढं देऊनही लग्नानंतर सासरच्यांकडून वैष्णवीचा छळ केला जात होता. छळाला कंटाळून तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात आलं होतं. त्यानंतर परत हा छळ सुरू राहिला. हुंड्यासाठी तिचा वारंवार छळ केला जात होता. त्यामुळे वैतागलेल्या वैष्णवीने आत्महत्या केली होती.
वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह 16 मे रोजी भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली.
या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता न्यायालयाने आरोप निश्चित केल्याने या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीला वेग येणार असून पुढील सुनावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.