अमेरिकेनं इराणवर हल्लाबोल केल्यानंतर जागतिक स्तरावर वातावरण अस्थिर झाले आहे. युद्धसंघर्षाचा परिणाम जागतिक स्तरावर भीषण दिसत आहे. युद्धसंघर्षाचा परिणाम दुबईवरही झाल्याने दुबई विमानतळावरुन उड्डाण घेणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे, अनेक भारतीय नागरिक, प्रवासी दुबईत अडकून पडले आहेत.
दरम्यान, पुण्यातील एका कॉलेजची शैक्षणिक सहलही दुबईला गेली असून या सहलीतील 80 विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. पुण्यामध्ये एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दुबईमध्ये गेली असून 80 विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले होते. दुबईत गेलेले हे सर्व विद्यार्थी 1 मार्च रोजी विमानाने भारताकडे परतीचा प्रवास करणार होते.
परंतु, ऐनवेळी दुबईतील विमानसेवा बंद झाल्याने हे सर्व 80 विद्यार्थी दुबईमध्ये अडकले आहेत. सध्या ते सुखरूप असून आई-वडील मात्र त्यांच्या काळजीत आहेत.