जगातील सर्वांत मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘डीपी वर्ल्ड’च्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेफ्री एप्स्टिनशी संबंधित कागदपत्रांमध्ये नाव आल्यानंतर मावळत्या अध्यक्षांना या पदावरून हटवण्यात आले आहे.
अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंधित कागदपत्रं, पुरावे समोर येताच जगभरातील अनेक मोठी, महत्वाच्या व्यक्तींची नावंही समोर येत आहेत. आखाती देशांमधील मोठ्या व्यक्तिमत्त्वांबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता दुबईतील मोठ्या उद्योगपतीला राजीनामा द्यावा लागला आहे.
दुबईतील एका प्रमुख बंदर आणि लॉजिस्टिक्स कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलयम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या नावाभोवती वाद वाढत असताना आणि आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला. या कंपनीचा व्यवसाय कॅनडा आणि भारतासह अनेक देशांमध्ये पसरलेला आहे, म्हणूनच या घटनेकडे जागतिक व्यावसायिक जगात एक मोठा बदल म्हणून पाहिले जात आहे.
अलिकडेच काही कागदपत्र उघडकीस आल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांची नावे चौकशी आणि छाननीत आली, त्यात मध्य पूर्वेतील एक प्रमुख व्यावसायिक व्यक्ती बिन सुलायम यांचाही समावेश होता. या आठवड्यात एक ब्रिटिश विकास वित्त एजन्सी आणि एक प्रमुख कॅनेडियन पेन्शन फंड या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांनी कंपनीतील नवीन गुंतवणूक थांबवण्याची घोषणा केली तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनली. वाद वाढल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
दुबई सरकारच्या ‘दुबई मीडिया ऑफिस’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सुलतान अहमद बिन सुलेयम यांचे नाव थेट घेतले नसले तरी, एस्सा काझिम यांची ‘डीपी वर्ल्ड’चे नवीन अध्यक्ष म्हणून आणि युवराज नारायण यांची ‘ग्रुप सीईओ’ म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. ही दोन्ही पदे यापूर्वी सुलेयम यांच्याकडे होती. ‘डीपी वर्ल्ड’ ही दुबईच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ मानली जाते. ही कंपनी दुबईतील जेबेल अली बंदर चालवते आणि जगभरातील इतर अनेक बंदरांमध्ये त्यांचे टर्मिनल्स आहेत.
काझीम हे सध्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरचे गव्हर्नर आहेत, तर नारायण हे 2004 सालापासून कंपनीशी संबंधित आहेत आणि त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. जागतिक कंटेनर वाहतुकीत त्यांचा वाटा १० टक्के आहे आणि ती अनेक खंडांमध्ये कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.