गेल्या काही दिवसांपासून एपस्टीन फाइलने जगात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने भल्याभल्यांची झोप उडाली आहे. आता याप्रकरणात एका मोठ्या व्यक्तीला अटक करण्यात अली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जगात खळबळ उडाली आहे. ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांचे छोटे भाऊ, पूर्व प्रिंस एंड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर अनेकांना धक्का बसला आहे.
बीबीसी च्या वृत्तानुसार,गुरुवारी (१९ फेब्रुवारी २०२६) ब्रिटनच्या स्पेशल पोलिसांनी पूर्व इंग्लंडमधील सँड्रिंघम इस्टेटवरील वुड फार्म येथून एंड्र्यू यांना अटक केली. एंड्र्यू यांना अटक करण्यासाठी साध्या कपड्यातील आठ पोलिस जवान पोहोचले होते. एंड्र्यू यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार जेफरी एपस्टीनला सरकारी गोपनीय कागदपत्र पुरवल्याचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आजच एंड्र्यू यांचा ६६ वा वाढदिवस आहे.
एंड्र्यू माउंटबॅटन-विंडसर कोण आहेत?
६५ वर्षांचे (आता ६६ वर्षे पूर्ण झालेले) एंड्र्यू अल्बर्ट क्रिश्चन एडवर्ड माउंटबॅटन-विंडसर हे स्वर्गीय राणी एलिझाबेथ II आणि प्रिंस फिलिप यांचे तिसरे मूल आहे. ते ब्रिटिश सिंहासनाच्या उत्तराधिकार क्रमात सध्या आठव्या क्रमांकावर आहेत.
ते किंग चार्ल्स III आणि रॉयल प्रिंसेस अॅनी यांचे छोटे भाऊ आहेत. पूर्वी ते प्रिंस एंड्र्यू, ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून ओळखले जात होते. पण २०२५ मध्ये किंग चार्ल्स III यांनी त्यांचे रॉयल टायटल्स, ऑनर्स आणि प्रिंस ही पदवी काढून घेतली. आता ते फक्त एंड्र्यू माउंटबॅटन-विंडसर म्हणून ओळखले जातात.