फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा;
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा; "हे" कारण आले समोर?
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : फ्रान्समधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. 

एलिझाबेथ यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर मॅक्रॉन यांच्या कार्यालयातून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं. जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, नवीन पंतप्रधान निवडून येईपर्यंत त्या सरकारचे अंतर्गत व्यवहार पाहतील. मात्र, नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.
 
एलिझाबेथ यांनी राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या युरोपियन निवडणुकांपूर्वी आपल्या सर्वोच्च संघात फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत.

मॅक्रॉन पुन्हा एकदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर एलिझाबेथ यांची मे 2022 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे त्या या पदावर होत्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.

पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात?
एलिझाबेथ यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री गॅब्रिएल अटल आणि संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेक्रोनू यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. याशिवाय अर्थमंत्री ब्रुनो ले मेरे आणि माजी कृषी मंत्री ज्युलियन डीनॉर्मंडी हेही संभाव्य पर्याय असल्याचे सांगितले जात आहेत. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group