धुळे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात बड्या नेत्यांच्या सभांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा आज खान्देशातील धुळे जिल्ह्यात झाली असून दुसरी सभा नाशिक येथे पार पडली.
दरम्यान धुळ्यातील सभेतून मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत संविधान, महिलांसाठी योजना आणि विकासाच्या मुद्द्यावर भाषण केले. केंद्र सरकारने कायम महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले. महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु केलेल्या योजनांची मविआने खिल्ली उडवली. मात्र, आज याच योजना प्रमुख आधार झाल्या आहेत. महायुती सरकारने 25 हजार महिला पोलिसांची भरती केली.
यामुळे महिलांना सामर्थ्य मिळाले, त्यांना रोजगार मिळाला, त्या सशक्त झाल्या, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भाषणात केला. पंतप्रधान मोदी यांनी
शुक्रवारी धुळ्यातील सभेतून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेतील भाषणानंतर मोदींनी सर्वच उमेदवारांना समोर येण्याचं आवाहन केलं. त्यावेळी, देवेंद्र फडणवीस हे धावत पळत आल्याचं पाहायला मिळालं.
पंतपधान नरेंद्र मोदींनी आपले भाषण संपल्यानंतर मोदींनी धुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना व्यासपीठावर समोर बोलावले होते.
त्यावेळी, देवेंद्र फडणवीस हे खु्र्चीवरच बसून होते. मात्र, नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत, देवेंद्रजी तुम्ही देखील उमेदवार आहात, असे म्हणताच फडणवीस धावत-पळतच पुढे आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, मोदींसोबत हातात हात घेऊन त्यांनी समोरील जनतेला अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.