दैनिक भ्रमर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमक्या देण्याचे सत्र चालू ठेवत पुन्हा नवीन धमकी दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याच्या कारणावरुन भारतावर सध्याच्या २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त २५ टक्के दंड लादला होता, हा २७ ऑगस्टपासून लागू केला जाऊ शकतो. दरम्यान, आता अमेरिकेने सर्वाधिक शुल्क लादणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला.
भारतावर रशियाकडून तेल आयात केल्यामुळे हे कर लादल्याचा दावा त्यांनी केला आता टॅरिफ लावल्यानंतर पुन्हा अमेरिकेने नवीन धमकी दिली आहे. शुक्रवारी ( १५ ऑगस्ट ) रशिया -युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा होणार आहे . अलास्का येथे होणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले. पण, अमेरिकेने या बैठकीचा संबंध भारत आणि टॅरिफ वॉरशी जोडला आहे.
या बैठकीवरुन अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी भारताला धमकी दिली. जर ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली तर अमेरिका भारतावर अधिक टॅरिफ लादेल, अशी धमकी त्यांनी दिली. "रशियन तेल खरेदी करण्यासाठी आम्ही भारतावर आधीच दुय्यम शुल्क लादले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर निर्बंध किंवा दुय्यम शुल्क वाढवले जाऊ शकतात", असंही बेसंट म्हणाले.