डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला वर्षपूर्ती; एका वर्षात जगाला हादरवणारे हे १० मोठे निर्णय घेतले
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला वर्षपूर्ती; एका वर्षात जगाला हादरवणारे हे १० मोठे निर्णय घेतले
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरु आहे. आज त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे , शपथविधीच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, दुसरा कार्यकाळ पहिल्यापेक्षा अधिक कडक, जलद आणि थेट असेल. आणि त्याप्रमाणे ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांनी जगात खळबळ उडवून दिली आहे. हे निर्णय नेमके कोणते होते, जाणून घ्या. 

१) टॅरिफ वॉर - दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवातच ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाने केली. जानेवारीत चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ, तर एप्रिलमध्ये ‘लिबरेशन डे’ जाहीर करून जवळपास सर्व देशांवर किमान १०% टॅरिफ लादण्यात आले. भारतासारख्या देशांवर ५०% पर्यंत टॅरिफ आणि ५००% पर्यंत धमकी देण्यात आली. 

२ ) व्हेनेझुएलावर कारवाई  - गेल्या वर्षात ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएला, नायजर, आर्मेनिया आणि सीरिया या देशांवर प्रभाव प्रस्थापित केल्याचा दावा केला. जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला व्हेनेझुएलावर नौदल नाकाबंदी, त्यानंतर लष्करी कारवाई करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेत आणण्यात आले. मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत.

३) इराणवर बी-2 बॉम्बर हल्ले - जूनमध्ये इराण-इस्रायल संघर्ष वाढला. त्यानंतर अमेरिकेने थेट हस्तक्षेप करत बी-2 बॉम्बर द्वारे ईराणच्या तीन महत्त्वाच्या अणुठिकाणांवर हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने कतारमधील अमेरिकन तळावर हल्ला केला.

४) DOGE ची स्थापना - सत्तेत येताच ट्रम्प यांनी अमेरिकन सरकार लहान करण्याचा निर्धार जाहीर केला. पहिल्याच दिवशी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) स्थापन करून त्याची धुरा उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे सोपवण्यात आली. DOGE अंतर्गत हजारो सरकारी कर्मचाऱ्यांची कपात, अनेक विभागांचे बजेट कमी करण्यात आले. याचा सर्वात मोठा फटका USAID ला बसला; संस्थेचे कामकाज जवळपास बंद झाले. 

५) इमिग्रेशनवर कडक कारवाई - अवैध स्थलांतराविरोधात ट्रम्प प्रशासनाने मोठी मोहीम राबवली. १९ गैर-युरोपीय देशांतील नागरिकांवर निर्बंध, हजारो व्हिसा रद्द, नवीन व्हिसांवर फ्रीज आणि मोठ्या शहरांत ICE च्या धाडी सामान्य झाल्या. मार्चमध्ये Alien Enemies Act लागू करून व्हेनेझुएलातील टोळी सदस्यांना देशाबाहेर काढण्यास सुरुवात झाली. काही शहरांत तीव्र विरोध झाला. मिनियापोलिस येथे ICE कारवाईदरम्यान एका महिलेच्या मृत्यूनंतर तणाव वाढला. गरज पडल्यास Insurrection Act लागू करू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

६) ट्रॅव्हल बॅन आणि कडक प्रवेश नियम - राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांच्या नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेश कठीण करण्यात आला. विमानतळांवर कडक तपासणी, दीर्घ चौकशी आणि काही प्रकरणांत थेट प्रवासबंदी लागू झाली. 

७) ‘वन बिग, ब्यूटीफुल बिल’ मंजूर - काँग्रेसने ट्रम्प यांचे महत्त्वाचे टॅक्स बिल मंजूर केले. सरकारी खर्चात मोठी कपात, पहिल्या कार्यकाळातील करसवलती कायम ठेवणे हे या कायद्याचे मुख्य मुद्दे. यातील ठळक तरतुदी टिप्सवरील कर रद्द (हॉटेल, रेस्टॉरंट, सेवा क्षेत्राला फायदा), चाइल्ड टॅक्स क्रेडिट वाढ, सीमा सुरक्षा, ऊर्जा उत्पादन आणि घरगुती धोरणांत मोठे बदल करण्यात आले. 

८)  इस्रायल-हमास युद्धातील युद्धविराम - इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात शस्त्रसंधी करार ट्रम्प यांची मोठी कूटनीतिक कामगिरी मानली गेली. २०२३ पासून सुरू असलेल्या संघर्षात हजारो मृत्यू झाले होते. मात्र, जमिनीवर इस्रायलचे हल्ले सुरूच असल्याचे वास्तव आहे. युद्धविरामाचा दुसरा टप्पा अलीकडेच लागू झाला असून, गाझासाठी ‘बोर्ड ऑफ पीस’ स्थापन करण्यात आला आहे. मात्र, रशिया–युक्रेन युद्ध पहिल्याच दिवशी संपवण्याचा दावा अजूनही पूर्ण झालेला नाही.

९) ६६ आंतरराष्ट्रीय संस्थांतून माघार - ट्रम्प यांनी ६६ आंतरराष्ट्रीय संस्था व करारांतून बाहेर पडण्याच्या मेमोरँडमवर स्वाक्षरी केली. व्हाइट हाऊसच्या मते, या संस्था अमेरिकन हितांच्या विरोधात असून करदात्यांचा पैसा वाया घालवत आहेत. यापैकी ३१ संयुक्त राष्ट्रांशी संलग्न, तर ३५ इतर आंतरराष्ट्रीय संस्था आहेत.

१० ) WHO मधून अमेरिका बाहेर - ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधून बाहेर काढले. महामारीदरम्यान चुकीचे निर्णय आणि अमेरिकेविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयाचा जागतिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group