न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. बुधवारी सकाळी या निवडणुकीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध असलेला भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी (३४) यांचा मोठा विजय झाला आहे. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्रयू कुओमो, तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.
या विजयामुळे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लीम तसेच आजवरचे सर्वात तरूण महापौर बनले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून उघड विरोध केला होता. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी न्यूयॉर्कच्या मतदारांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्क शहराचा निधी अडवू, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट
“ममदानी हे न्यूयॉर्क शहरातील स्वयंघोषित कम्युनिस्ट आहेत. ते जर महापौरपदाची निवडणूक जिंकले तर त्यांना वॉशिंग्टनकडून विरोधाचा सामना करावा लागेल. न्यूयॉर्क सारख्या महान शहराच्या महापौराने इतिहासात कधीही वॉशिंग्टनशी वैर घेतले नव्हते. मात्र ममदानी यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. लक्षात ठेवा, महापौर म्हणून निवडून आल्यावर त्यांना त्यांच्या कम्युनिस्ट आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी माझ्याकडूनच निधीची गरज भासेल. त्यांना अजिबात निधी दिला जाणार नाही. मग त्यांना मतदान करण्यात काय अर्थ आहे?”, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.