'आम्ही अर्ध जग नष्ट करु', पाक लष्करप्रमुखाची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी, भारताचंही प्रत्युत्तर
दैनिक भ्रमर - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मुनीर यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टाम्पा येथे पाकिस्तानी नागरिकांसोबत बोलताना म्हटले होते की, "आपण एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. जर आपल्याला असे वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू." सिंधू नदी कराराचा उल्लेख करताना “भारत सिंधू नदीवर डॅम बनवतोय. आधी धरण बांधू दे, आम्ही मिसाइल हल्ल्याने ते धरण फोडून टाकू” अशी धमकी दिली. यावर आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले की, “अणवस्त्र शस्त्रांची धमकी देणं पाकिस्तानची जुनी सवय आहे. अशा प्रकारची वक्तव्य किती बेजबाबदारपणाची आहेत, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला दिसतय. अशी वक्तव्य आधीपासून जो संशय आहे, त्याला अजून बळकटी देतात. ज्या देशाच सैन्य दहशतवादी संघटनांसोबत आहे. तिथे अणवस्त्रांच नियंत्रण आणि जबाबदारीवर विश्वास ठेवता येणार नाही, “आम्ही अणवस्त्र ब्लॅकमेलिंग समोर झुकणार नाही, हे भारताने आधीच स्पष्ट केलय. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलत राहू” असेही ते म्हणाले.