दैनिक भ्रमर : जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सत्तेवर आल्यापासून ट्रम्प प्रशासनाचा तिथे बेकायदरित्या राहणारे प्रवासी, विद्यार्थी आणि एक्सचेंज वीजा होल्डर्सना डिपोर्ट करण्यावर भर आहे. ट्रम्प यांनी आधीच 50 टक्के टॅरिफ लावून भारताला मोठा धक्का दिला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच काही प्रमाणात नुकसान होईल.
टॅरिफनंतर ट्रम्प प्रशासन आता भारतीयांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेत कायदेशीररित्या राहणाऱ्या 5.5 कोटीपेक्षा जास्त परदेशी नागरिकांच्या वीजाची समीक्षा केली जात आहे. इमिग्रेशन नियम मोडणाऱ्या परदेशी नागरिकांचा वीजा रद्द करण्यासाठी हे सर्व सुरु आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आलं.
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय 5.5 कोटीपेक्षा जास्त संख्येने असलेल्या परदेशी नागरिकांबाबत असला, तरी यात भारतीय सुद्धा आहेत. अमेरिकेत सॉफ्टवेअर, आयटी क्षेत्रात भारतीय मोठ्या संख्येने काम करतात. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा त्यांना सुद्धा फटका बसू शकतो. नियमांच उल्लंघन आढळून आल्यास त्यांचा वीजा तात्काळ रद्द होईल. त्यांना त्यांच्या देशात पाठवून देण्यात येईल.