देवा का रे इतकी परीक्षा ? बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं
देवा का रे इतकी परीक्षा ? बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजाला कायमच घेरलं आहे. कधी पाऊस नसल्याने पिकाचे नुकसान कधी जास्त पावसाने शेतीचे नुकसान या संकटातून बाहेर निघाला तर न मिळणाऱ्या हमीभावाचं संकट, या सर्वात तो कायमच संकटात सापडतो आणि उचलतो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. यावर आता सरकारने ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. 

शेतकरी आणि बैलांचा सण मानल्या जाणाऱ्या बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं. संसार अर्ध्यावर सोडून त्यांनी मृत्यूला कवटाळलं. आत्महत्येची ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातुन समोर आली आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानामुळे गणपत भाऊजी नागापुरे या शेतकऱ्यानं किटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. मृत शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन होती. 

दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत असे. यावर्षी त्यांनी तीन एकरमध्ये कापूस, धान पेरले होते.मात्र, संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला. पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली गेली. अद्यापही त्यांची शेती पाण्याखालीच आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतीचे डोळ्यादेखत नुकसान होताना बघणे त्यांना असह्य झाले. 

घटनेच्या दिवशी त्यांनी शेत गाठले. तसेच शेतातील कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवले. नागापुरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group