टी-20 वर्ल्डकपचा थरार सुरू झाला असून प्रत्येक क्रिकेटप्रेमी चांगलाच उत्सुक आहे. येत्या रविवारी, म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्यावर अनिश्चिततेचं सावट घोंगावत होतं. श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान भिडणार की नाही ? टी20 वर्ल्ड कप 2026मध्ये त्यांचा सामना होणार की नाही ? असे प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडले असून त्याच संदर्भात आता मोठी अपडेट समोर येताना दिसत आहे.
टी-20 वर्ल्डकप 2026 मधील सर्वात मोठा सामना घडवून आणण्यासाठी आयसीसीकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रविवारी, 8 फेब्रुवारी रोजी आयसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्षही उपस्थित होते.या बैठकीत पाकिस्तानने भारताविरुद्धचा बॉयकॉट मागे घेण्यासाठी आयसीसीसमोर तीन मोठ्या अटी ठेवल्या आहेत.
पाकिस्तानच्या आयसीसीसमोरच्या तीन अटी
1. आयसीसीकडून पाकिस्तानला अधिक महसूल वाटा द्यावा.
2. भारत आणि पाकिस्तानदरम्यान पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू करावी.
3. टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे.
पाकिस्तानची दुसरी मागणी म्हणजेच भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्याची भारतासाठी पूर्णपणे अमान्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 साली खेळली गेली होती. गेल्या 16 वर्षांपासून राजकीय तणावामुळे दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येत आहेत.