दैनिक भ्रमर : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादलं आहे. ही करवाढ २७ ऑगस्टपासून लागू होईल. भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. या सर्वात थोडी आश्चर्यदायक अशी घटना घडली आहे.
या टॅरिफ वॉर मध्ये चक्क चीन भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर पाकिस्तानचा सच्चा मित्र चीन भारताच्या बाजूनं असल्यानं काहीसं आश्यर्य व्यक्त केलं जात आहे. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावल्यानंतर चीनची भूमिका समोर आली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी टॅरिफ धोरणाच्या दुरूपयोगाला स्पष्ट विरोध असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान चीनच्या या भूमिकेवर अमेरिका काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. पुतिन यांचा हा दौरा 2025 च्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबद्दल माहिती दिली आहे.अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दौऱ्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे.