अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका बसला आहे. यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने ट्रम्प यांना फटकारत त्यांच्या टॅरिफ निर्णयाला स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांनी सत्तेत येताच अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे जगभरात टॅरिफ युद्ध भडकण्याची स्थिती निर्माण झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णय यशस्वी ठरले आहेत. मात्र काही निर्णयांनी ट्रम्प प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातीलच एक निर्णय टॅरिफचा होता.
ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. त्यांच्या या निर्णयावर जगातील अनेक देशांनी आक्षेप घेतला होता. परंतु, ट्रम्प काही केल्या माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर या वादात न्यायालयाचा निर्णय महत्वाचा ठरला आहे. न्यायालयाने ट्रम्प सरकारचा टॅरिफचा निर्णयच स्थगित केला आहे.
न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प सरकारला फटकारलं. जगभरात समन्यायी तत्व सांगत जारी करण्यात आलेले टॅरिफ लागू करण्याबाबतचे आदेश राष्ट्राध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन आहे.
अमेरिकेतील आयात नियंत्रित करण्यासाठी टॅरिफचा वापर करणं हे घटनेने त्यांना दिलेल्या अधिकारांचंही उल्लंघन आहे, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारांचा मर्यादा पार करून इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्टचा वापर केला आहे. व्हाइट हाऊसचं हे वर्तन कायद्याच्या विरुद्ध जाणारं असेही न्यायालयाने नमूद केले.
यानंतर सरकारनेही आपली बाजू मांडली. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर तडजोडीच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशाने यात अडथळा आला तर अमेरिकेची प्रतिमा खालावेल. अध्यक्षांचे हात बांधले जातील असा युक्तिवाद सरकारने केला. मात्र न्यायालयाने सरकारचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. फक्त राजकीय कारणांसाठी राष्ट्राध्यक्षांना असे अधिकार वापरू देऊ शकत नाहीत अशा शब्दांत न्यायालयाने ट्रम्प सरकारला फटकारले.
एलन मस्कही सरकारमधून बाहेर
एलन मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कालावधी आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे मी राष्ट्रपती ट्रम्प यांना मला संधी दिली म्हणून धन्यवाद देऊ इच्छितो. DOGE मिशन अधिक मजबूत होईल कारण हेच सरकार चालवण्याची एक पद्धत बनेल. मस्क यांनी ही घोषणा करण्याआधी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ट्रम्प यांच्या Big Beautiful विधेयकावर मस्क यांनी जोरदार टीका केली होती.