अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ म्हणजे आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. युक्रेनमध्ये हत्याकांड घडवणाऱ्या रशियाकडून भारताने लष्करी साहित्य आणि उर्जा खरेदी केल्यामुळे भारतावर हा मोठा शुल्क लावत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसेच रशियासोबतच्या व्यापारामुळे भारताला या शुल्काव्यतिरिक्त दंडही भरावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही घोषणा केली.
त्यांनी आणखी एक धक्का देणारी घोषणा करत डबल अटॅक केला. ट्रम्प यांनी भारताचा शत्रू पाकिस्तानसोबत हातमिळवणी केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानचं विशाल तेल भंडार विकसित करण्याचा करार निश्चित केला आहे.ट्रम्प यांनी हा खुलासा आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथसोशलवर केला आहे. त्यांनी लिहिलय की, “आम्ही पाकिस्तानसोबत एक मोठा करार केला आहे. त्यांचं विशाल तेल भंडार विकसित करण्यासाठी त्यांच्यासोबत मिळून काम करणार आहोत. आम्ही लवकरच या कराराच नेतृत्व करणाऱ्या तेल कंपनीची निवड करणार आहोत. कोणाला माहित, कदाचित एकदिवस ते भारताला तेल विकतील” असं ट्रम्प म्हणाले.