पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. त्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांनाही बॅन करण्यात आले. तसेच क्रिकेट प्रेमींनीदेखील पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला.
नंतर तरीही आशिया चषक २०२५ च्या स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. सदर प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इतके कोटी रुपये मिळाले
तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळून आमच्याविरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकु पुसण्यासाठी त्यांना सक्षम करताय. पाकिस्तान जिंकला-पराभूत झाला, याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. अशा सामन्यावर आम्ही थुंकतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. पैशांसाठी खेळले, एका सामन्यावर बहिष्कार टाकू शकले नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.
भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावर काल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला. या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे १००० कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. तसेच या दीड लाख कोटी रुपयांमधून साधारण २५ हजार कोटी रुपये पाकिस्तानात गेले, असा दावाही संजय राऊतांनी केला. आता हाच पैसा आपल्याविरुद्ध वापरला जाणार, असं संजय राऊत म्हणाले.
टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं, नाही याचं भाजपवाले कौतुक सांगताय. देशाची जनता मुर्ख आहे का?, तुम्ही पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळलात ना?, देशासाठी लोकांनी रक्त सांडलं, फासावर गेले, अनेक लोक शहीद झाले आणि तुम्ही हस्तांदोलन केलं नाही, त्याचं कौतुक करताय, हे हस्तांदोलन केलं नाही, हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर झालं का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.