अमेरिका-इस्रायल गेल्या १७ दिवसांपासून इराणवर हल्ला करत आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर जागतिक स्तरावरही या युद्धाची झळ बसत आहे. युद्धाचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक व्हिडीओ हे एआय चा वापर करून बनवले गेले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल संयुक्त अरब अमिराती (UAE) सरकारने १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.
संशयितांनी युद्धाचा फायदा घेत चुकीची माहिती देणारे व्हिडिओ पसरवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर जलद गतीने खटला चालवला जाणार आहे. ही कारवाई दोन टप्प्यांत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शनिवारी १० जणांविरुद्ध (ज्यात २ भारतीय होते) आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता १७ भारतीयांसह २५ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.संयुक्त अरब अमिरातीमधील कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी किमान १ वर्षाचा कारावास आणि किमान १,००,००० दिराम (अंदाजे २३ लाख रुपये) दंडाची तरतूद आहे. ॲटर्नी जनरल शम्सी म्हणाले की, "काही व्हिडिओंमध्ये मुलांच्या भावनांचा गैरवापर करून सुरक्षेला धोका असल्याचे भासवले गेले असून हे अत्यंत गंभीर आहे."
युएईचे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्सी यांनी सांगितले की, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, अस्थिरता निर्माण करणारे बनावट माहिती रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर कडक देखरेख ठेवली जात आहे. UAE च्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार WAMने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, या प्रकरणी तपासात असे समोर आले आहे की आरोपींनी तीन वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे केले. यामध्ये सध्याच्या सुरु असणार्या घडामोडींचे वास्तविक व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने वापरणे, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा वापर करुन बनावट व्हिडिओ तयार करणे आणि लष्करी आक्रमक कृती करणाऱ्या देशाचे समर्थन आणि त्यांच्या नेतृत्वाचे उदात्तीकरण करणे, आदी गुन्ह्यांखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
AI द्वारे तयार केलेले स्फोटांचे बनावट व्हिडिओ किंवा परदेशातील जुन्या घटनांचे व्हिडिओ युएईमधील असल्याचे सांगून शेअर केल्या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ५ भारतीयांचा समावेश आहे. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्यांनी या व्हिडिओंमध्ये राष्ट्रीय ध्वज आणि तारखांचा वापर केला होता, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.