इराण अमेरिका संघर्ष काहीसा थांबताना दिसत आहे. सध्या दोन्ही देशात युद्धबंदीचा करार असून या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. कारण या युद्धामुळे या देशांचेच नाही तर संपूर्ण जगाचे एकप्रकारे नुकसान होत आहे. दरम्यान सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, फैसल बिन फरहान यांनी अमेरिकेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
अमेरिकेवरील अवलंबून राहण्याचं युग आता संपलंय, असं ते म्हणाले. जे आपल्या देशाचे संरक्षण करू शकत नाहीत, ते सौदी अरेबियाचे संरक्षण कसे करू शकतील? असा प्रश्न विचारत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. त्यांचं हे विधान म्हणजे, बदलत्या प्रादेशिक राजकीय समीकरणांचे आणि अमेरिकेवरील अवलंबित्व कमी होण्याचे लक्षण मानले जात आहे.
या युद्धकाळात सौदी अरेबियाने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण आहे, कारण इराण संघर्षातील सहभागामुळे त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकन वृत्तपत्रातील वृत्तानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नौदल नाकेबंदी तात्काळ उठवण्यासाठी आणि वाटाघाटीच्या टेबलावर परत येण्यासाठी सौदी अरेबिया अमेरिकेवर दबाव आणत आहे. जर अमेरिकेने ही नाकेबंदी सुरूच ठेवली, तर इराण त्यांचे पर्यायी मार्ग रोखून प्रत्युत्तर देऊ शकतो अशी भीती सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांना आहे.