युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी गुडघे टेकले, पण का ?  'ही' आहेत कारणे
युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी गुडघे टेकले, पण का ? 'ही' आहेत कारणे
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाला वेठीला धरणारं आणि एका मोठ्या विध्वंसाच्या दिशेने वाटचाल सुरु असलेलं इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर तात्पुरते थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही, असे सांगत शस्त्रसंधीची घोषणा केली. त्याचवेळी ट्रम्प यांनी इराणकडून आलेला 10 कलमी तहाचा प्रस्तावही मान्य असल्याचे संकेत दिले आहेत. वरवर पाहता ट्रम्प यांनी समझोत्याची भूमिका घेतल्याचे वाटत असले तरी इराणसोबतचा युद्धविराम स्वीकारणे ही त्यांची गरज बनली होती, कारण त्यांच्याकडे सध्या कोणताही ठोस पर्याय शिल्लक नव्हता, असे मत परराष्ट्र धोरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

युद्ध थांबण्याचे कारण 

स्वत:ची इमेज वाचवण्याचा प्रयत्न - ट्रम्प यांनी मंगळवारी इराणला शेवटचा इशारा दिला होता. हा इशारा म्हणजे केवळ दिखाव्यासाठी होते. संध्याकाळी होणारा करार हा स्वतःच्या अटींवर झाला आहे, असे जगाला भासवण्यासाठी ट्रम्प यांनी आधी आक्रमक पवित्रा घेतला होता.

ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला धोका - जर अमेरिका आणि इस्रायलने इराणसोबत पूर्णवेळ युद्ध पुकारले असते, तर त्याचे परिणाम ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला उद्ध्वस्त करणारे ठरले असते. मोठ्या युद्धाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम ट्रम्प यांना परवडणारा नव्हता.

ऊर्जा संकटाची भीती - ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. परंतु, तसे झाल्यास इराणने आखाती देशांतील तेल साठ्यांवर प्रतिहल्ला केला असता. यामुळे जगासमोर सध्याच्या संकटापेक्षाही मोठे ऊर्जा संकट उभे राहिले असते, ज्याची भीती संपूर्ण जगाला होती.

ट्रम्प यांचे राजनैतिक नाट्य - याचा अर्थ ट्रम्प यांनी दिलेला इशारा आणि त्यानंतर लगेच स्वीकारलेला युद्धविराम हे एक राजनैतिक नाट्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करून अमेरिकेची आर्थिक कोंडी केल्यामुळे, ट्रम्प यांना लष्करी कारवाईऐवजी चर्चेचा मार्ग निवडणे भाग पडले आहे. इराणच्या अटींवर चर्चा करण्यास ट्रम्प यांचे तयार होणे, हे दर्शवते की अमेरिकेला या युद्धाची मोठी किंमत मोजावी लागत होती. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group