मध्य पूर्वेतील तणाव वाढतच चालला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनी याची सुरुवात झाली, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून परिस्थिती अधिक बिघडलीय. इराणनेदेखील प्रत्युत्तर म्हणून हल्ले सुरू केले, आखाती देशांमधील अमेरिकन तळ आणि दूतावासांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर हल्ले वाढवले आहेत.
इस्रायली हवाई दल इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर सतत हल्ला करत आहे. इस्रायलने तेहरान-बैरूत येथे हवाई हल्ले केले. आतापर्यंत इराणमध्ये 742 लोक ठार झाले आहेत आणि 750 हून अधिक जखमी झाले आहेत.
दरम्यान, इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सनी एक मोठी घोषणा केलीय. त्यांनी सांगितल्यानुसार होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी बंद करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल.
हा निर्णय इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सुरू असलेल्या युद्धातील एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे जागतिक तेल व्यापारात व्यत्यय येऊ शकतो. परिणामी तेलांच्या किमतीचा भडका उडण्याची दाट शक्यता असून त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होण्याची दाट शक्यता आहे.