मोठी बातमी : अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी
मोठी बातमी : अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी
img
वैष्णवी सांगळे
गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळ युद्धाचं सावट जगावर घोंगवतंय, अमेरिका-इस्रायलने इरणावर हल्ला चढवल्यावर युद्धाला तोंड फुटलं आणि त्यांच्यासह जगभरातील अनेक देश होरपळले. जागतिक तणावही वाढला. मात्र आता जगासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. युद्धात आक्रमक भूमिका घेतलेल्या अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती दर्शवली असून, इस्रायलनेही हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी लागू राहील. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत अल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. 

इराणचा दोन आठवडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य  करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती ही या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या युद्धविरामात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानले. 

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याचं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनी यांनी दिलेल्या माहितीनूसार, अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोजतबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती. 

अमेरिका आणि इराणचं युद्ध कोणत्या 10 अटींवर युद्ध थांबलं? 

1. अहिंसेप्रती कटिबद्धता

2. होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार

3. युरेनियम संवर्धनास परवानगी

4. सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती

5. सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती

6. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे

7. गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे

8. इराणला नुकसानभरपाई देणं

9. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार

10. लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम
इतर बातम्या
Join Whatsapp Group