अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत अमेरिकन सैन्याने इराणच्या महत्त्वाच्या खर्ग आयलँडवरवर अत्यंत शक्तिशाली हवाई हल्ले केल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यात बेटावरील सर्व इराणी लष्करी लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा मात्र मुद्दाम सुरक्षित ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ल्यांपैकी एक हल्ला केला. या कारवाईत खर्ग बेटावरील सर्व लष्करी लक्ष्य नष्ट करण्यात आले. मात्र मानवी आणि आर्थिक परिणाम लक्षात घेऊन त्यांनी त्या बेटावरील तेल पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
इराणच्या उत्तरेकडील पर्शियन आखातात असलेले खर्ग बेट हे देशाच्या तेल निर्यातीचे सर्वात महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या बेटातून इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सुमारे 90 टक्के निर्यात केली जाते. हे बेट हॉर्मुझची सामुद्रधुनीपासून सुमारे 483 किलोमीटर उत्तर-पश्चिमेला असून इराणच्या मुख्य भूभागापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, या बेटावर दररोज सुमारे 70 लाख बॅरल तेल जहाजांवर लोड करण्याची क्षमता आहे. त्यामुळे खर्ग बेटावर झालेला हल्ला इराणच्या ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, अमेरिका या भागात लष्करी ताकद वाढवत आहे. अमेरिकेने या प्रदेशात अतिरिक्त 2,500 मरीन सैनिक आणि तीन युद्धनौका पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या जहाजांवर केलेले हल्ले हा अंतिम इशारा आहे आणि पुढील आठवड्यात इराणविरुद्ध आणखी कठोर कारवाई सुरू राहू शकते.