इराणने सोमवारी रात्री उशिरा इराक आणि सीरियाच्या अनेक भागात जोरदार मिसाईल हल्ले केले. इराणने अर्बिलमधील गुप्तहेरांचे मुख्यालय आणि इराणविरोधी दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केल्याचे म्हटले आहे. इराणच्या हल्ल्यात चार नागरिक ठार आणि सहा जखमी झाले आहेत. ही क्षेपणास्त्रे अमेरिकन कॉन्सुलेटजवळ पडली होती.
दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नाही. अर्बिल येथे अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. 10 क्षेपणास्त्रे यूएस वाणिज्य दूतावासाच्या परिसरात पडली आहेत. ही क्षेपणास्त्रे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने डागली आहेत, असे इराकच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मृतांमध्ये अब्जाधीश कुर्दिश व्यापारी पेशरा दिझाई आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या घरावर रॉकेट पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिझाई हे सत्ताधारी बरझानी गटाच्या जवळचे होते. कुर्दिस्तानमधील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक होती.