इस्रायल आणि हमास यांच्यात शांततेसाठी युद्धविरामावर सहमती झाली होती. मात्र, शुक्रवारपर्यंत दोन्ही देशांकडून कोणताही हल्ला करण्यात येणार नाही, असं ठरलं होतं. मात्र, युद्धबंदीची मुदत संपल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने हमासच्या गाझा पट्टीत पुन्हा जोरदार बॉम्बफेक केली. यामध्ये तब्बल १७८ पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तब्बल ५८९ लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
इस्त्रायली लष्कराने दक्षिण गाझामधील काही भाग रिकामा करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी हवाई हल्ले केले आहेत. काहीही झालं तरी आम्ही युद्ध थांबवणार नाही, असंही इस्रायलने ठामपणे सांगितलं आहे.
७ ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमासमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. आतापर्यंत या युद्धामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली होती. इतर देशांच्या मध्यस्थीनंतर २४ नोव्हेंबरपासून दोन्ही देशांनी ७ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली. यावेळी हमासने इस्रायली ओलीसांची सुटका केली.
इस्रायलने देखील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. या युद्धबंदीदरम्यान हमासने ७० हून अधिक लोकांना ओलीस ठेवलं होतं. यामध्ये महिला, मुले आणि परदेशी नागरिकांचाही समावेश होता. दुसरीकडे, ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात, इस्रायलने १६० हून अधिक कैद्यांची सुटका केली. बुधवारी म्हणजेच युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशीही हमासने १६ ओलिसांची सुटका केली.
मात्र, शुक्रवारी युद्धविराम संपताच इस्रायलने हमासच्या गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यात तब्बल १७८ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासने केला आहे. याशिवाय ५८९ जण जखमी असल्याचं हमासकडून सांगण्यात आलं आहे.