मुंबई : इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे. याच युद्धाचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही पडला आहे. या युद्धामुळे मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावरील निर्देशांक चांगलेच गडगडताना दिसतायत. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे या युद्धाचा फटका जगातील श्रीमंत व्यक्तींना देखील बसला आहे.
युद्धामुळे जगातील टॉप १० श्रीमंत लोकांच्या संपत्तीत सुमारे २८ अब्ज डॉलर्स म्हणजेच २३,३९,९७,८२,००,००० रुपयांची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, इलॉन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यांची एकूण संपत्ती ६.८४ अब्ज डॉलरने घसरली आहे.
श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३.११ अब्जची घट झाली आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती ४.०८ अब्ज डॉलरने घसरून १७८ अब्ज झाली आहे. बिल गेट्सच्या संपत्तीतही १.६५ अब्जची घट झाली.
स्टीव्ह बाल्मरच्या संपत्तीत २.६९ अब्ज, लॅरी पेजची २.४३ अब्ज, वॉरेन बफेची १.३२ अब्ज आणि सेर्गे ब्रिनची संपत्ती २.३० अब्जने कमी झाली आहे. दुसरीकडे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती सोमवारी ८०६ दशलक्ष डॉलर्सने घसरली आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत २.३६ अब्ज डॉलरची घट झाली. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी १४ व्या, तर मुकेश अंबानी ११ व्या स्थानावर आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती २.९१ अब्ज डॉलर्सने वाढून २१८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.