नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून नेमकं काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी निर्मला सीतारामन शेती, महिला, रोजगार यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच उद्योग, आयटी, सेवा, फार्म या क्षेत्रांसाठीही केंद्र सरकार काय तरतुदी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्राच्या तरतुदी आणि घोषणांनुसार आता शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळू शकतात. या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारावरही पडसाद पडण्याची शक्यता आहे.
त्याआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय. शेअर बाजार चालू झाल्यानंतर भांडवली बाजाराचे प्रमुख दोन्ही निर्देशांकांत फारशी वाढ झालेली नाही.
राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थिती काय?
राष्ट्रीय शेअर बाजाराबाबत बोलायचं झालं तर सोमवारी शेअर बाजार दिवसाअखेर 24,509.25 अंकांवर स्थिरावला होता. आज बाजार चालू झाल्यानंतर एनएसईमध्ये 24,568.90 अंकांपर्यंत वाढ झाली. शेअर बाजार चालू झाल्यानंतर निर्देशांकांत फारसा बदल झालेला दिसला नाही. म्हणजेच सध्या गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत.
22 जुलै रोजीच्या सत्राच्या शेवटीदेखील गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसले. 23 जुलै रोजी दिवसाअखेर मुंबई शेअर बाजारात 102.57 अंकांची घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारा काल दिवसाअखेर 80,502.08 अंकांवर स्थिरावला. तर सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 21.65 अंकांची किरकोळ घसरण पाहायला मिळाली. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासाची गती मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
त्यामुळे काल गुंतवणूकदारांत काही प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. त्यामुळे आज निर्मला सीतारामन कोणकोणत्या घोषणा करणारण? आकर्षक घोषणा करून त्या गुंतवणूकदारांची हीच भीती कमी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.