भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅकरॉक यांना म्युच्यूअल फंडात येण्यास मंजुरी दिली आहे. उद्योगपती मुकेस अंबानी यांच्या नेतृत्त्वातील जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या म्युच्यूअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढू शकत.
जिओ फायनॅन्शियलने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिओ फायनॅन्शियलने दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅकरॉक फायनॅन्शियल मॅनेजमेंटसोबतच्या संयुक्त व्हेंचरला म्युच्यूअल फंडात प्रवेश करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या या व्हेंचरला अंतिम मंजुरी दिली जाईल. या दोन्ही कंपन्यांनी जुलै 2023 मध्ये एकमेकांशी करार केलेला आहे. म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये प्रवेश मिळावा या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे ऑक्टोबर 2023 मध्ये परवान्यासाठी सेबीकडे अर्ज केला होता. या दोन्ही कंपन्या त्यांच्या नव्या प्रकल्पासाठी 15-15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.