भारताला मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचं आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. आपला कंटेंट, लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाच्या आधेर भारत लवकरच या क्षेत्रात मक्तेदारी करेल असंही ते म्हणाले आहेत.
मुकेश अंबानी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 मध्ये बोलत होते. पुढील दशकापर्यंत भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र चारपटींनी वाढ नोंदवेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. म्हणजेच 100 अरब डॉलरपेक्षा मोठा आकडा गाठू शकतो. सध्या मार्केट 28 अरब डॉलर्सचं आहे.
मुकेश अंबानी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र बनला आहे. कथा सांगण्याची शैली आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या संगमामुळे भारताच्या मनोरंजन आणि सांस्कृतिक प्रभाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे.
एआय आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कथा पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवू शकतात. तसंच ते विविध भाषा, देश आणि संस्कृतींमधील प्रेक्षकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतात. मला विश्वास आहे की भारतातील अति-प्रतिभावान तरुण जागतिक मनोरंजन क्षेत्रावर राज्य करतील.
मनोरंजनाचं जागतिक केंद्र
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख करत ते म्हणालेकी, "AI आता मनोरंजनासाठी ते करत आहे, जे 100 वर्षांपूर्वी सायलेंट कॅमेराने केलं होतं. तेदेखील लाखपटीने उत्तम असेल. जगातील लोक मागील 5 हजार वर्षांपासून गोष्टी ऐकत आहे. कंटेंट आणि लोकसंख्येनंतर भारताची तिसरी ताकद तंत्रज्ञान आहे. भारतात 1.2 बिलियन मोबाईल फोन युजर्स आहेत. याचा अर्थ 1.2 बिलियन स्क्रीन आहेत, ज्यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जाऊ शकतो. जिओने हाय-स्पीड इंटरनेट डेटा परवडणारा बनवून भारतातील डिजिटल आणि मनोरंजन क्रांतीचा पाया रचला आहे. 5G वर बांधलेली आमची जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा लवकरच 6G पर्यंत वाढवली जाईल."
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, "आम्ही जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची बरोबरी करण्याच्या आणि त्यांच्या पुढे जाण्याच्या महत्त्वाकांक्षेने जियोहॉटची सुरुवात केली आहे. हे भारत आणि परदेशातील सर्वोत्तम प्रतिभांना एक व्यासपीठ उभारत आहे. आम्ही प्रेक्षकांच्या संख्येचे रेकॉर्ड तोडले आहेत, आयपी स्ट्रीमिंगमध्ये क्रांती घडवली आहे आणि इमर्सिव्ह, बहुभाषिक, इंटरअॅक्टिव्ह क्रीडा दृश्यांचे जागतिक मानक देखील बदलले आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे. डिस्नेसोबत जिओची भागीदारी डिजिटल स्टोरी-टेलिंगमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे."
पहलगाम हल्ल्यावरही बोलले मुकेश अंबानी
त्यांनी सांगितलं की, "वेव्ह्स इनोव्हेशन, संस्कृति आणि सहयोगाचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यास तयार आहे. आपला 5 हजारांहून अधिक वर्षाचा इतिहास आहे. आपल्याकडे गोष्टी, कथांचा मोठा खजिना आहे. रामायण आणि महाभारतापासून आपल्याकडे डझनभर भाषांमध्ये लोककथा आणि क्लासिक्स आहेत. यामध्ये मूल्य, बंधूता, शौर्य, प्रेम आणि सुंदरता आहे जे जगभरातील लोकांच्या मनाला स्पर्श करतात. कोणताही देश भारताच्या कथा सांगण्याच्या ताकदीला स्पर्धा देऊ शखत नाही".
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ते म्हणाले की, "आम्ही सर्व पीडित कुटुबांप्रती संवेदना व्यक्त करतो. इतक्या कठीण काळातही पंतप्रधानांनी येथे येणं देशासाठी संदेश आहे. मोदीजी शांतता, न्याय आणि माणुसकीच्या शत्रूंविरोधातील या लढाईत तुम्हाला 145 कोटी भारतीयाचं समर्थन आहे. भारताचा विजय निश्चित आहे".