मुंबई : शेअर बाजारात कधी काय होईल हे सांगता येत नाही. या बाजारात एखादा गुंतवणूकदार एका क्षणात कोट्यधीश होतो तर कधी एखादा गुंतवणूकदार क्षणात उद्ध्वस्त होऊन जातो.
सध्या मात्र एका कंपनीने इतिहास रचला आहे. या कंपनीत काही हजार रुपये गुंतवणारे थेट कोट्यधीश झाले आहेत. या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर एका दिवसात तीन रुपयांवर थेट सव्वा दोन लाखांच्याही पुढे गेला आहे. एका दिवास एवढी मोठी भरारी घेऊन या शेअरने भांडवली बाजारात इतिहास रचला आहे.
एलसिड इन्व्हेस्टमेंटने रचला इतिहास
शेअर बाजारात एका दिवसात नवा इतिहास रचणाऱ्या या कंपनीचे नाव एलसिड इन्व्हेस्टमेंट असे आहे. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 3.53 रुपये होते. हे मूल्य एका दिवसात थेट तब्बल 2,36,250 रुपये झाले. म्हणजेच या शेअरने एका दिवसात तब्बल 66,92,535 टक्क्यांनी भरारी घेतली आहे. या कामगिरीनंतर एलसिड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी भारतीय भांडवली बाजारात सर्वांत महाग शेअर असणारी कंपनी बनली आहे.
तीन रुपये होता शेअर, सूचिबद्ध होताच...
एलसिड इन्व्हेस्टमेंट या कंपनीचा शेअर जुलै महिन्यात फक्त 3.21 रुपयांवर होता. 29 ऑक्टोबर रोजी ही कंपनी मुंबई शेअर बाजारावर पुन्हा एकदा सूचिबद्ध झाली. ही कंपनी सूचिबद्ध झाली तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य (बुक प्राईज) 2,25,000 रुपये होतो. त्यानंतर ड्रेडिंगदरम्यान या शेअरमध्ये आणखी पाच टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे हा शेअर थेट 2,36,250 रुपयांवर पोहोचला. आज (31 ऑक्टोबर) हा शेअर 2 लाख 48 हजार 62.50 रुपयांवर आहे.