दीर अल-बलाह - हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान २७४ पॅलेस्टिनी ठार तर शेकडो जखमी झाले, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. या मोहिमेत चार इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली. गाझाच्या दाट लोकवस्तीच्या भागात दिवसा ही कारवाई करण्यात आली.
हमासने इस्रायली ओलिसांना दाट लोकवस्तीच्या भागात किंवा बोगद्यांत ठेवल्याचे मानले जाते. फेब्रुवारीत अशाच एका मोहिमेत दोन ओलिसांची सुटका करण्यात आली होती. तेव्हा ७४ पॅलेस्टिनी मारले गेले होते. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. यात १२०० इस्रायली ठार झाले होते, तर २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते.
तेव्हापासून इस्रायलचे पॅलेस्टाईनवर हल्ले सुरू असून, यात आतापर्यंत ३६ हजार ७०० हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. शनिवारच्या हल्ल्यात ७०० लोक जखमी झाले असून मृतांत अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
अमेरिकेतील ५० विद्यापीठांत निदर्शने
एप्रिलमध्ये अमेरिकेतील ५० विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी महिनाभर आंदोलन केले होते. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची हॅमिल्टन बिल्डिंगही ताब्यात घेतली होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत इमारत मुक्त केली. यानंतर, आठवडाभरापूर्वी पॅलेस्टाईन समर्थकांनी न्यूयॉर्कमधील एका संग्रहालयाचा ताबा मिळवला होता.
व्हाईट हाऊससमोर पॅलेस्टिनींची निदर्शने वाॅशिंग्टन :
गाझातील इस्रायली हल्ल्यांदरम्यान ३० हजार पॅलेस्टाईन समर्थकांनी अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊससमोर निदर्शने केली. हमासचे बँड बांधलेले निदर्शक पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावताना दिसले. निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज पेटवून ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या.