चार दिवसांसाठी थांबणार इस्राइल-हमास युद्ध; 50 ओलिसांच्या सुटकेसाठी शस्त्रसंधीचा करार
चार दिवसांसाठी थांबणार इस्राइल-हमास युद्ध; 50 ओलिसांच्या सुटकेसाठी शस्त्रसंधीचा करार
img
Dipali Ghadwaje
मागील एका महिन्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना, हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी आवाहन केले आहे. दरम्यान, हे युद्ध आता थांबण्याची शक्यता आहे.

इस्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेलं इस्राइल-हमास युद्ध आता चार दिवसांसाठी थांबणार आहे. पहिल्यांदाच या दोन्ही पक्षांमध्ये शस्त्रसंधीबाबत चर्चा होऊन करार झाला आहे. हमासने ओलिस ठेवलेले इस्राइलचे 50 नागरिक सोडावेत यासाठी चार दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी इस्राइलने होकार दिला आहे.

7 ऑक्टोबर रोजी गाझा पट्ट्यातून हमासने इस्राइलवर मोठा हल्ला केला होता. यावेळी इस्राइलवर सुमारे 5 हजार क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. तसंच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलच्या सीमेत प्रवेश केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून काही तासांमध्येच इस्राइलने युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर गाझा पट्ट्यामध्ये इस्राइलने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले होते. लष्करी कारवाई करत काही दिवसांपूर्वीच इस्राइलचं सैन्य गाझा शहरापर्यंत पोहोचलं होतं.
 
दरम्यान इस्राइल-हमास युद्ध आता चार दिवसांसाठी थांबणार आहे. पहिल्यांदाच या दोन्ही पक्षांमध्ये शस्त्रसंधीबाबत चर्चा होऊन करार झाला आहे. परंतु हा या युद्धाचा अंत नसल्याचं देखील इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. "आमचे सर्व ओलिस नागरिक परत आणणे, हमासचा खात्मा करणे आणि गाझामध्ये इस्त्राइलला धमकी देणारा कोणताही समूह शिल्लक राहणार नाही याची खात्री करणे ही आमची उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत युद्ध संपणार नाही" असं नेतन्याहू म्हणाले.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कतारमधील अधिकारी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमास आणि इस्राइलमधील शस्त्रसंधीची चर्चा घडवून आणली. बायडेन यांच्यामुळेच अधिक ओलिस नागरिकांची सुटका शक्य झाल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलं.  

 काय आहे करार?
  • या युद्धामधील ही पहिलीच शस्त्रसंधी आहे. या शस्त्रसंधीमुळे गाझामध्ये मदत पोहोचवणं शक्य होणार आहे.
  • चार दिवसांच्या शस्त्रसंधीच्या काळात हमासने ओलिस ठेवलेल्या 50 महिला आणि लहान मुलांची सुटका होणार आहे.
  • ही शस्त्रसंधी गुरुवारपासून लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • हमास आणखी ओलिस नागरिकांना सोडत असल्यास, दर दहा नागरिकांच्या बदल्यात एक दिवस अशी शस्त्रसंधी वाढवण्यास इस्राइल सरकारने सहमती दर्शवली आहे.
या युद्धामध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईन आणि इस्राइलच्या हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आताच्या शस्त्रसंधीमुळे आता लवकरच हे युद्ध संपेल अशी आशा निर्माण झाली आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group