इस्रायलच्या दक्षिण भागात हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या भीषण हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार झाल्या आहेत. एका वृत्त संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. यापैकी एक अधिकारी महाराष्ट्रातून इस्रायलला गेलेल्या स्थलांतरित होत्या.
अशदोदच्या होम फ्रंटच्या कमांडर असलेल्या २२ वर्षीय लेफ्टनंट ऑर मोसेस आणि सीमा पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर किम डोकरकर या दोघी सात ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यात ठार झाल्या. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा लढताना मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धात आतापर्यंत २८६ लष्करी जवान आणि ५१ पोलिस अधिकारी धारातीर्थी पडले आहेत. बळींचा आकडा वाढू शकतो, कारण इस्रायल मृतांची ओळख पटवत आहे, आणि बेपत्ता किंवा संभाव्य अपहरण झालेल्या नागरिकांचाही शोध घेत आहे. शहाफ टॉकर या २४ वर्षीय महिला तिच्या मित्रासह या हल्ल्यातून थोडक्यात बचावली.
इस्रायल-हमास संघर्षात आत्तापर्यंत २,३२९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. पॅलेस्टिनींसाठी पाच गाझा युद्धांपैकी हे सर्वांत घातक ठरले आहे. इस्रायलसाठी, १९७३च्या इजिप्त आणि सीरियामधील संघर्षानंतरचे हे सर्वांत प्राणघातक युद्ध ठरले आहे.