मध्य पूर्वेतील कतारची राजधानी असलेल्या दोहावर बॉम्बिंग केल्यानंतर, इस्रायलने येमेनवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. काही तासांत, येमेनमधील प्रमुख बंदरांना लक्ष्य केले जाईल, अशी घोषणा इस्रायलने केली होती. महत्वाचे म्हणजे, येमेनच्या लाल समुद्रावरील होदेइदाह बंदरही रिकामे करण्याचा आदेशही देण्यात आला असल्याचे इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले होते त्यानुसार इस्रायलने येमेनच्या बंदराला लक्ष्य केले आहे.
हुथी बंडखोरांना संपवण्यासाठी इस्रायल देश पेटून उठला आहे. इस्रायलने येमेनच्या बंदराला लक्ष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने होदेदा शहरातील बंदरावर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता येमेन आणि इस्रायल यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. या हल्ल्याचा दावा इराणचे समर्थन असणाऱ्या येमेन देशातील हुथी बंडखोरांनी केला आहे.
या दाव्यानुसार इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांना परतावून लावण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय करण्यात आली आहे. हुथी संघटनेचे प्रवक्ते याह्या सारी यांनीही इस्रायलच्या हल्ल्याबाबत एक्सवर पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. दरम्यान, आता हुथींवर केलेल्या या हल्ल्यानंतर येमेन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. इस्रायल-येमेन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.