७ ऑक्टोबर रोजी गाझा स्थित हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर ५ हजार रॉकेट डागले होते. यामध्ये शेकडो इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर इस्राइलने हमासला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा २७ वा दिवस आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्राइलकडून सातत्याने हमासवर हवाई हल्ले केले जात आहेत. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच गाझा येथे सुरू असलेल्या लढाईत भारतीय वंशाच्या २० वर्षीय इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे. हलेल सोलोमन (वय २० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या जवानाचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , महापौर बेनी बिटन यांनी बुधवारी फेसबुकवर पोस्ट लिहत सोलोमन यांच्या मृत्युबाबतची माहिती दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बेनी बिटन म्हणतात, 'आज आमच्यासाठी दुःखद क्षण आहे. हमास या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या लढ्यात आम्ही हलेल सोलोमन या २० वर्षीय जवानाला गमावलं आहे'.
'हलेल हा एक अज्ञाधारक मुलगा होता, ज्याला आपल्या पालकांबद्दल आदर होता. हलेलच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. हलेल हा एक अज्ञाधारक मुलगा होता, ज्याला आपल्या पालकांबद्दल आदर होता', असंही बेनी बिटन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिवसेंदिवस हे युद्ध भयंकर होत चाललं आहे. इस्राइल गाझामधील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इस्रायलने मंगळवारी गाझातील सर्वात मोठे निर्वासित शिबिर असलेल्या जबालियावर हवाई हल्ले केले. यामध्ये हमासचा कमांडर इब्राहिम बियारीसह सुमारे ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला.