मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला असतानाच इराणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय कुस्तीपटू सालेह मोहम्मदी याच्यासह दोन तरुणांना इराणमध्ये फाशी देण्यात आली आहे. 19 वर्षीय कुस्तीपटूला इराणमधील नव्या खामेनी सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. इराणमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च शिक्षा होण्याचे हे पहिलेच प्रकरण मानले जात आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या तिघांमध्ये 19 वर्षीय राष्ट्रीय पदक विजेता कुस्तीपटू सालेह मोहम्मदी याचाही समावेश होता. तर मेहदी घासेमी आणि सईद दाव्वुदी अशी अन्य दोघा आंदोलकांची नावे आहेत.
जानेवारी महिन्यात खामेनी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्या तिघा तरुणांवर तेहरानच्या दक्षिणेस सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या ’कोम’ शहरात दोन पोलीस अधिकार्यांचा निर्घृण खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आदोलना संदर्भात ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा अधिकार्यांनी यापूर्वीच दिला होता. इराणमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सहसा फाशीने दिली जाते.
कोण होता सालेह मोहम्मदी?
सालेह मोहम्मदी हा इराणमधील कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून ओळखला जात होता. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने छाप पाडल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये रशियातील क्रास्नोयार्स्क येथे झालेल्या ‘Saitiev International Cup’ या स्पर्धेत सालेहने इराणसाठी कास्यपदक जिंकले होते. फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर त्याचे समाजमाध्यमांवर अनेक जुने व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओत तो कुस्तीच्या मैदानात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चितपट करताना दिसून आला. त्याची खेळाप्रति असलेली निष्ठा पाहून समाजमाध्यमांवर भावूक प्रतिक्रिया उमटल्या.
जानेवारीमध्ये झाली होती अटक
जानेवारी महिन्यात इराणमध्ये उसळलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान सालेह मोहम्मदीला कोम शहरातून ताब्यात घेण्यात आले होते. डिसेंबर २०२५ च्या शेवटी इराणवर भीषण आर्थिक संकट ओढवले होते. देशाच्या चलनाचे मूल्य कोसळल्यामुळे महागाईचा दर ४० टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी इराणमध्ये अन्नपदार्थांच्या किमतींत तब्बल ७२ टक्के वाढ झाली होती. या आर्थिक असंतोषाचे रूपांतर लवकरच सरकारविरोधी निदर्शनांमध्ये झाले. ८ जानेवारी रोजी कोम शहरात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली. १९७९ च्या इराण क्रांतीनंतरचे हे सर्वांत भीषण दडपशाहीचे सत्र मानले जात होते. त्याच रात्री पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली. त्यामध्ये सालेह मोहम्मदी याच्यासह त्याचे दोन मित्र मेहदी घासेमी व सईद दाऊदी समावेश होता.