भारताकडे येणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला, २ भारतीय खलाशांचा मृत्यू
भारताकडे येणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला, २ भारतीय खलाशांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
अमेरिका , इराण, इस्त्रायलच्या युद्धाने रौद्र रूप धारण केले आहे. या युद्धांत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. हे युद्ध आता तीन देशपर्यंतच मर्यादित न राहता या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. भारताला देखील युद्धाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. या आखाती देशांमधून कच्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात भारतात केली जाते. मात्र ही आयात जवळपास ठप्प झाल्याने भारतात मोठी इंधन टंचाई जाणवत आहे. 

दरम्यान या युद्धाचा थेट परिणाम भारतीय सागरी व्यापारावर आणि नागरिकांवर झाला आहे. थायलंडच्या मालकीचे मयुरी नारी या जहाजावर इराणने हल्ला केला आहे.हे मालवाहू जहाज गुजरातच्या कांडला बंदराकडे येत होते. त्याचवेळी इराणने त्यावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा जागीच मृत्यू झाला असून, एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी नारी हे जहाज व्यावसायिक माल घेऊन अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशेने प्रवास करत होते.आखाती देशांमधील तणाव वाढल्याने इराणने या भागातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या जहाजावरही हल्ला करण्यात आला.या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी केंद्राने २४ तास कार्यरत असणारा विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तसेच बेपत्ता असलेल्या एका भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेतली जात आहे. त्यासोबतच या जहाजावरील खलाशांना जवळील किनारपट्टीवर आणून त्यांना उपचारासाठी भरती करण्यात येत आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' आणि अरबी समुद्रातील व्यापारी मार्ग असुरक्षित बनले आहेत. भारताचा मोठा व्यापार या मार्गावरून होत असल्याने, या हल्ल्याचा परिणाम कच्च्या तेलाची आयात आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group