स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ऑलिम्पिकचे आयोजन भारतात करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ऑलिम्पिकचे आयोजन भारतात करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
आज १५ ऑगस्ट रोजी देशात ७८वा  स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर भाषण करताना खेळाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. यासह पंतप्रधानांनी पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच ऑलिम्पिक खेळांचे भारत आयोजन करण्याबाबत पंतप्रधानांनी महत्वाचे  वक्तव्य केले आहे .

२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन भारतात होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केली जातील, असे त्यांनी सांगितले. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. यासोबतच जी२० परिषदेच्या आयोजनाबद्दल सांगत २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळाचे आयोजन भारतात होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
 
“आज आपल्यासोबत ते तरुणही आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली आहे. १४० कोटी देशवासियांच्या वतीने मी आपल्या या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. येत्या काही दिवसांत पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी भारताची मोठी तुकडी पॅरिसला रवाना होणार आहे, मी आमच्या सर्व पॅरालिम्पियन्सना शुभेच्छा देतो. असे पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून सांगितले.

“भारताने G20 शिखर परिषद भारतात आयोजित केली होती आणि देशभरात २०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावरून हे सिद्ध झाले की भारतामध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची क्षमता आहे. आता २०३६ च्या ऑलिम्पिकचे भारतात आयोजन करण्याचे भारताचे स्वप्न आहे आणि आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत.”

स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारे खेळाडूही लाल किल्ल्यावर उपस्थित होते. मनू भाकेर, स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंग, अमन सेहरावत, भारताचा हॉकी संघ आणि नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने चार कांस्य आणि एका रौप्य पदकासह एकूण ६ पदके जिंकली.

खेळांचे महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकमध्ये जगातील जवळपास सर्वच देश सहभागी होतात. त्यामुळे ऑलिम्पिकचे आयोजन करणे ही कोणत्याही देशासाठी अभिमानाची बाब आहे. भारताने या क्रीडा महाकुंभाचे कधीच आयोजन केले नाही. त्यामुळेच २०३६ मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक समिती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group