पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. आज ते मुंबई आणि नवी मुंबईत उपस्थित राहणार आहेत, तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच ते महायुतीच्या आमदारांसोबत संवादही साधणार आहेत.
भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर याचं या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होतील.
5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, त्यानंतर आज ते पुन्हा, दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत. तसेच इस्कॉन मंदिराचा आज लोकार्पण आहे. लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खारघर मध्येही येणार आहेत.
मुंबईच्या नौदल गोदीत पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी 10.30 च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होईल. भारतीय नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासमवेत दाखल व्हायला सुरवात झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहनाना प्रवेश नसल्याने नौदलाच्या वाहनांनी निमंत्रीतांना आणलं जात आहे. नेव्हीच्या टायगर प्रवेश द्वारावरून सर्वांना मुख्य कार्यक्रमासाठी सोडलं जात आहे.
तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे.
आयएनएस सूरत, P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील 75% सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे.
आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात.
आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून,पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.
आमदारांना काय देणार कानमंत्र ?
तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण झाल्यानतंर पंतप्रधान मोदी हे महायुतीचे मंत्री तसेच आमदारांशी संवाद साधतील, त्यांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.