मुंबई : पोलिस अधिकाऱ्यांचे पगार, सुविधांचा दर्जा, निवासस्थानांची दुरवस्था यावर बरेचदा लिहिले जाते. संघटनांचा अधिकार नसलेला हा वर्ग सरकारवर दबावही आणू शकत नाही. अडचणी असल्या तरी कर्तव्य पार पाडत निवृत्त झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या नशिबी मृत्यूनंतर मात्र आता सन्मान येणार आहे.
पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात. मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलानं नवा निर्णय घेतलाय.
निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांनी सर्व विभागांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विभागाला निवृत्त झालेल्या पोलिसांची माहिती अद्ययावत ठेवण्यासह त्यांच्या निधनाची तात्काळ नोंद घ्यावी लागणार आहे.
निवृत्त पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर सरकारी ईतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, याची जबाबदारी संबंधित विभागावर आहे. यासाठी विशिष्ट वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पूर्ण पोलीस गणवेशात अंत्यसंस्काराच्या वेळेस उपस्थित राहतील.
दर्जा मोठा असल्यास म्हणजेच मोठ्या पदावरील अधिकारी असल्यास ‘गार्ड ऑफ ऑनर’ आणि बिगुल शोक सलामी दिली जाईल. हे सगळं वेळच्या वेळी व्हावं म्हणून स्थानिक स्तरावर एक समन्वय अधिकारीही नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जर मृत अधिकारी पोलीस महासंचालक किंवा अतिरिक्त महासंचालक दर्जाचे असतील, तर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपमहानिरीक्षक किंवा त्यावरचा अधिकारी हजर राहील.
महानिरीक्षक किंवा उपमहानिरीक्षक मृत्यू पावल्यानंतर अधीक्षक किंवा वरच्या दर्जाचा अधिकारी, तसेच अधीक्षक किंवा अतिरिक्त अधीक्षक मरण पावल्यास उपअधीक्षक किंवा त्यावरचा अधिकारी अंत्यसंस्काराला हजर राहणार आहे. निरीक्षक किंवा कमी स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक उपनिरीक्षक असलेले अधिकारी पोलीस गणवेशात उपस्थित राहतील.
सामान्य जनतेसाठी राबणाऱ्या, त्यांच्या साठी आयुष्य अर्पण करणाऱ्या निवृत्त पोलिसांचा अखेरचा प्रवासही राज्य पोलीस दलाच्या सलामीने व्हावा, ही भावना यामागे व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, आत्महत्या किंवा अपकीर्तीच्या स्थितीत म्हणजेच गुन्हयात समावेश असणे, गंभीर आरोप असलेल्या मरण पावलेल्या पोलिसांना हा सन्मान देण्यात येणार नाही, असंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे. उपस्थित अधिकारी प्रतिनिधींनी अंत्यसंस्कारानंतर संबंधित कुटुंबातील सदस्यांना वरिष्ठांचा शोकसंदेश द्यायचा असून, असा प्रोटोकॉल ठरवला गेला आहे.