सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून देवगड तालुक्यातील वरेरी येथे एका 20 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सध्या पोलिसांकडून या हत्येमागील अधिक तपशीलवार चौकशी सुरू असून, परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , खून झालेल्या युवकाचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव (20) असून तो मूळचा मध्यप्रदेशातील आहे. सद्यस्थितीत तो वरेरी, कुळये सडेवाडीनजीक असलेल्या चिरेखाणीवर राहत होता.
या प्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या रितीक दिनेश यादव (20) या संशयित आरोपीला अटक केली आहे. कृष्णकुमार आणि रितीक हे चुलत भाऊ असून, काही दिवसांपूर्वीच ते कामासाठी मध्यप्रदेशातून देवगडमध्ये आले होते.
नेमकं काय घडलं?
वरेरी, कुळये सडेवाडीनजीक असलेल्या चिरेखाणीवर सध्या सुमारे 8 ते 10 परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. याच ठिकाणी कृष्णकुमार यादव आणि रितीक यादव हे चुलत भाऊ देखील काम करत होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास, या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचा कारण ठरले सिगारेट पेटवण्यासाठीचा लायटर. रितीक याने कृष्णकुमारकडे लायटर मागितला, मात्र वाद वाढल्याने कृष्णकुमारने रितीकच्या कानशिलात मारले.
या अपमानामुळे संतप्त झालेल्या रितीकने ट्रकमधून लोखंडी टॉमी (रॉड) काढली आणि कृष्णकुमारच्या डोक्यावर जोरदार घाव घातला. घाव इतका भयंकर होता की कृष्णकुमारचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने रितीकने टॉमी जवळच असलेल्या चिरेखाणाच्या पाण्यात फेकून दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी देवगड तालुक्यातील तळेबाजार येथून चिरेखाणीवर कामासाठी पोहोचलेल्या मुकादम विजय शेंडगेंना तेथे काम करणारे कृष्णकुमार यादव आणि रितिक यादव हे दोघे दृष्टीस न पडल्यामुळे त्यांनी इतर कामगारांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना, चिरेखाणीच्या पाण्यात कृष्णकुमार याचा मृतदेह आढळून आला आणि या धक्कादायक दृश्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
मात्र त्याचा चुलत भाऊ रितिक यादव कुठेही दिसून आला नाही. काही वेळाने रितिक यादव तळेबाजार बाजारपेठेच्या परिसरात दिसून आल्याची माहिती मिळताच मुकादम शेंडगे यांनी प्रसंगावधान बाळगून त्याला थांबवले व घटनेची संपूर्ण माहिती तात्काळ देवगड पोलिसांना दिली.
यासोबतच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेंडगेंनी देवगडचे पोलीस पाटील पारकर यांनाही याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील पारकर यांनी ही माहिती तात्काळ देवगड पोलीस स्थानकात कळवली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबत तपास सुरु केला. दरम्यान, संशयित आरोपी रितेश याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.