वाहतूक पोलिसाला मारहाण , आरोपी ताब्यात ;  कुठे घडली घटना?
वाहतूक पोलिसाला मारहाण , आरोपी ताब्यात ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
पुणे : उंड्री चौकामध्ये वाहतूक नियमनासाठी तैनात पोलिसांवर एका व्यक्तीने हल्ला करून मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणून त्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.

त्यानंतर पोलिसाच्या कानशिलात लगावून दुसऱ्या अंमलदाराच्या शर्टाची कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , गणेश लक्ष्मण कदम (वय ४०) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याला पोलीस अंमलदारांनी समजावून सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे त्याने पोलिसांवरच हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उमेश राजू दाभेकर हे गेल्या तीन वर्षांपासून कोंढवा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. १ एप्रिलला ते अशोक म्हस्के यांच्यासोबत उंड्री चौकात कर्तव्यावर होते. शंकर मंदिराजवळ एकजण लोकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एका रिक्षाचालकाने पोलिसांना दिली.

कडेला लावलेल्या दुचाकी तो रस्त्यावर ढकलत होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मंदिराजवळ असलेल्या दुचाकींना लाथ मारून एकजण त्या रस्त्यावर पाडत असल्याचे, तसेच परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्याने ओरडून शिवीगाळ करत असल्याचे दिसले. पोलिसांनी वाहने बाजूला करण्यास सुरुवात केली असता, त्याने संतापून दाभेकर यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. 

अंमलदार अशोक म्हस्के यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांचीही कॉलर पकडली. तसेच, दोघा पोलीस अंमलदारांना ढकलून जिवे मारण्याची धमकी दिली. झटापटीत पोलिसांचा गणवेश खराब झाला. अंमलदार दाभेकर यांच्या शर्टाची दोन बटणे आणि नेमप्लेट तुटली, तर म्हस्के यांच्या गणवेशाच्या उजव्या खांद्याची पट्टी फाटली.

घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी तत्काळ गणेश कदम याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group