संतापजनक : भीक मागण्यासाठी
संतापजनक : भीक मागण्यासाठी "या" ठिकाणी चिमुरडीचे अपहरण ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
भीक मागायला लावण्यासाठी  पुण्यातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिला नेणाऱ्या  एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुरडीची सुखरूप सुटका करत टोळीतील पाच जणांना अटक केली असून, यात एका महिलेचाही समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०) , शालुबाई प्रकाश काळे (वय ४५) , गणेश बाबू पवार (वय ३५) , मंगल हरफुल काळे (वय १९), असे  अटक करण्यात आलेले आरोपींची नावे  आहे  हे सर्वजण मोतीझारा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव)  येथील रहिवासी आहेत.

फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे (वय २५) हे आपल्या कुटुंबासह कात्रजमधील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात वास्तव्यास आहेत. त्यांना चार अपत्य असून त्यातील दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. घटना २५ जुलै रोजी रात्रीची आहे. रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपेत असताना, चिमुरडीला झोपाळ्यातून उचलून नेण्यात आले. मध्यरात्री जाग आल्यावर ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेची गंभीर दखल घेत पीडित मुलीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली. याशिवाय गुन्हे शाखेने स्वतंत्र तपासपथक कार्यरत केले.

तपासात वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यात तीन जण एका दुचाकीवर मुलीसह जाताना दिसून आले. पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्थानक परिसरातील १४० सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये आणखी दोघे आरोपी दिसून आले.

 फुटेज आणि माहितीच्या आधारे तपास पथक तुळजापूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या ताब्यातून अपहृत चिमुरडी सुखरूप सापडली. पुढील चौकशीत उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली.

दरम्यान  आरोपींनी भीक मागण्यासाठीच चिमुरडीचे अपहरण केल्याची कबुली दिली. पाचही आरोपींना पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group