हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळंच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड केली. संतप्त जमावानं हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला त्यामुळं परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटल परिसरात पोलीस दाखल झाले.
हडपसर येथे असलेल्या सह्याद्री रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर रुग्णालयातील सपकाळ यांच्या संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयात तोडफोड केली. यावेळी रुग्णालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातील काचा कचऱ्याचा स्टीलचा डबा आणि लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने फोडण्यात आल्या. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला होता. यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले.
या सगळ्याबाबत शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख आहे. माझ्याबाबत ही गोष्ट असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल. माझ्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात अल्सरचं ऑपरेशन होणार होतं. ही फक्त दोन टाक्यांची साधी शस्त्रक्रिया होती. मात्र, सह्याद्री रुग्णालयाने हळूहळू माझ्या वडिलांना डॅमेज केलं. हे हॉस्पिटल बकवास आहे, थर्डक्लास आहे. सह्याद्री रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी आहे. तोपर्यंत आम्ही रुग्णालयाबाहेरून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका अजय सपकाळ यांनी घेतली.
तर सह्याद्री हॉस्पिटलने म्हटले आहे की, रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. हा ७६ वर्षीय रुग्ण २८ नोव्हेंबर रोजी आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाला होता. त्याचे मल्टी-ऑर्गन फेल्युअर झाले होते. शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला आमच्याकडे दाखल करण्यात आले होते. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केलेल्या व्यापक प्रयत्नांनंतर आणि सर्व योग्य, पुराव्यावर आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही, रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखीन बिघडत गेली आणि दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले होते.