हिंजवडी परिसरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे याच्यावर रविवारी दुपारी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंजवडीसारख्या आयटी हब मध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अजिंक्य विनोदे हे हिंजवडीतील जुन्या जकात नाका परिसरात असलेल्या ‘बेलबॉटम’ नावाच्या हॉटेलमध्ये भाडे वसुलीसाठी गेले होते. मात्र, त्यावेळी भाडेकरूंशी त्यांचा वाद झाला आणि पाहता पाहता परिस्थिती चिघळली. संतापलेल्या भाडेकरूंनी अजिंक्य विनोदे यांच्यावर पिझ्झा कटर, काटे-चमचे आणि सिमेंट ब्लॉकसारख्या वस्तूंनी हल्ला केला. या हल्ल्यात अजिंक्य गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यात सुमित सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, बंटी ठाकरे आणि समाधान अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की या आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हिंजवडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.