पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भिगवण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बारामती पोलीस ठाण्यात त्यासोबतच बारामती सत्र न्यायालयासमोर मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं आता तिचा जबाब बदलला आहे. भिगवण प्रकरणातील मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भिगवण प्रकरणातील मुलगी मुस्लीम समाजातील तरुणासोबत १७ फेब्रुवारी रोजी निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भिगवणमधून निघून गेल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनला २० फेब्रुवारी रोजी तरुणासह हजर झाली होती. मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. ती तरुणासोबत राहण्यावर ठाम होती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीची महिला पुनर्वसन केंद्रात रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली.
यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणीने आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.