पुणे येथील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली. मुलीच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा पुढे आली. मात्र माझं अपहरण झालंच नाही तर मी स्वतःच्या मर्जीने तरुणासोबत आले असं म्हणत संबंधित तरुणीने तिचा व्हिडीओ शेअर केला आणि याप्रकरणाला नवीन वळण मिळालं. हे प्रकरण अपहरणाचं नसून प्रेमप्रकरणाचं असल्याचं एकंदरीत समोर येत आहे कारण तरुण आणि तरुणीमध्ये अपहरणाच्या अधिक कॉल आणि मेसेज झालेले आहेत.
दरम्यान मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करुन पोलीस अधिकारी, त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलेलं होतं, दोन चार दिवसात लग्न होणार होतं, अशा परिस्थितीत जबरदस्तीनं मुलीचं अपहरण केलं गेलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. मुलीचं अपहरण झाल्यानं भिगवणला आलो आहे. भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. हिंदू समाज संतापलेला आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांसोबत करणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसोबत फोनवर चर्चा केली आहे. हा व्हिडिओ कोठून आला असा प्रश्न विचारला. लोकेशन न दिसणारं एप वापरलं आहे, असं पोलिसांनी सांगितल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांनी आरोपींच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप केले आहेत. "आरोपीचे चुलते इथले गुंड आहे. त्यांची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. मागे हिंदू मुलीच्या अपहरणातही त्याचा सहभाग होता. इथल्या हिंदू मंदिरावर ते कब्जा घेत आहेत, मंदिरातील मूर्त्यांची त्यांनी तोडफोड केलेली आहे. हे कसं काय होतंय? इतके दिवस पोलीस का गप्प आहेत. इतके गुन्हे असताना त्याच्यावर मकोका का लावलेला नाही, अशा सगळ्या मुद्द्यांवर मी पोलिसांशी चर्चा करणार आहे," असं पडळकर म्हणाले.