भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झाल्याची घटना समोर आली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर आली आहे. काल रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणू हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्याचं नाव आहे.
शरणू हांडेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप
गोपीचंद पडळकर यांनी जखमी कार्यकर्त्याची भेट घेतली. यावेळी हांडे यांनी नेमकी घटना काय घडली याबाबत माहिती सांगितली. यावेळी त्यांनी रोहित पवारांचं देखील नाव घेतलं आहे. 'रोहित पवार हे व्हिडिओ कॉलवर बोलत होते. तेव्हा मला सांगितलं अमित सुरवसेची माफी माग, मी नाही म्हणाल्यावर याला बघून घ्या, असं रोहित पवार म्हणाले', असं म्हणत शरणू हांडेंनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले ?
रोहित पवार यांनी पडळकर यांना टार्गेट करा, अशा सूचना महादेव देवकते याला दिल्या होत्या. तसेच अमित सुरवसे आणि महादेव देवकते याच्या छातीवर शरद पवारांचा टॅटूचा फोटो आहे. 2021 सालच्या प्रकरणात महादेव देवकाते याचे ही स्टेटमेंट पोलिसांनी घेतलं पाहिजे. यवतमध्ये जी घटना घडली त्यावर हे एक शब्द ही बोलत नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्रमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्रित होतायत, त्यांना हे पटत नाहीये. शरणू म्हणतोय की, त्याला सुरुवातीला मांडीला मारलं, पूर्ण मारण्याचा प्लॅन होता. अमानुष मारून हत्या करून व्हिडीओ करायचा प्लॅन होता. या प्रकरणातील आरोपीचे मूळ शोधलं पाहिजे. व्हिडीओ कॉल केला होता, तो कोणाला केला? हे अपहरण करणारे मुलं इतकं करू शकत नाही. 2021 च्या प्रकरणाचा पुन्हा तपास केला पाहिजे. जर सहभागी असेल तर रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.