राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात प्रचार सभांचा, रॅलींचा धडाका सुरू आहे. अशातच कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.
मिळालेलया माहितीनुसार, रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशातच अक्षय शिंदे यांच्या पक्ष प्रवेशामुळे रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
अक्षय शिंदे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्याबरोबर सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्यांनी अजित दादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.