राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अवघे तीन दिवसही झाले नाही तोच राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे. सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची राष्ट्रवादीने सुरू केली आहे. दरम्यान शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे.
रोहित पवार यांचे ट्विट
बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा…!
आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा.. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?
डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे... ना आनंदाचा जल्लोष…!
गळ्यात हार घातलेला मा. अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय…
आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.!
#AjitdadaPawar